तुम्ही पुढे वाचण्याआधी “मांजर प्रवेश” वाचून या…. थोडेसे संदर्भ वाचन म्हणून….
आमच्या घरात सगळ्या गोष्टीना नावे आहेत. जमेल त्या सगळ्या गोष्टीना नावे ठेवायचे आमच्या घराण्याची परंपरा आहे असे म्हणल्यास हरकत नाही. तर या नव्या फ्यामिली मेम्बर चे नाव ‘मार्जार’ ठेवावे असा माझा प्रस्ताव होता. पण तो कुणाला ऐकायला गेलाच नाही बहुतेक. कारण माझे पप्पा तिला(मांजराला) चोरटी प्रिन्सेस म्हणतात. आता प्रिन्सेस चोरटी कशी असेल हेच मला कळत नाही. प्रिन्सेस ला सगळया सुखसोयी आपसूक हजर असतात मग तिला काही चोरायची काय गरज? पण असो. माझी आई तिला ‘आली ग बया मनी’ म्हणते. आता जगातल्या सगळ्या मांजरांचे नाव मनी असते हा योगायोग आहे. माझा भाऊ तिला ‘ए शुक शुक’ म्हणतो. आता शुक म्हणजे पोपट हे त्याला माहित नाही का पण मांजराला पोपट म्हणण्यात काहीतरी मजा असेल जी मला अजून तरी समजली नाही. मी मात्र या प्रिन्सेस मनी शुक ला म्याव म्हणतो. आता हे काय नाव झाले असे तुम्ही म्हणाल. पण आपण गायीला नाही का हंबा म्हणत तसेच मी मांजराला म्याव म्हणतो.
आता या म्याव चे नखरे ऐक्ण्याजोगे आहेत. तिला फक्त ताजे पदार्थच चालतात. कोणतीही गोष्ट जर ४ तासांपेक्षा आधी केली असेल तर तिला तोंड हि लावण्याचे कष्ट ती घेत नाही. भूक लागल्यानंतर तिच्या अंगात एकदम लता मंगेशकर संचारत. कुठल्याही मांजराला इतक्या गोड आवाजात म्याव म्हणताना मी कधी ऐकले नाही. आणि ते फक्त म्याव नसते. बऱ्याचदा ते माSSSव, मांSSS, मांSSSSSSSSSSSSSSSSव असेही असते. म्हणजे एकंदरीत काम करून घेण्यासाठी लाडात येणाऱ्या सौफ्टवेअर कंपनीतल्या मुलींसारखा तिचा आवाज असतो. आणि समजा तुम्ही तिच्या समोर गेलातच तर तिच्या हाती येईल त्या पार्टला अंग घासून गुदगुल्या करत बसते. आता गुदगुल्या केल्या म्हणून कोणी खायला देतं का? मग अस्वलांना शिकार करायची गरजच पडली नसती. त्यांनी नुसते पकड एक माणूस कर गुदगुल्या, पकड दुसरा माणूस कर गुदगुल्या असे करून पोट भरले असते.