मांजर आणि आम्ही – भाग १

तुम्ही पुढे वाचण्याआधी “मांजर प्रवेश” वाचून या…. थोडेसे संदर्भ वाचन म्हणून….

आमच्या घरात सगळ्या गोष्टीना नावे आहेत. जमेल त्या सगळ्या गोष्टीना नावे ठेवायचे आमच्या घराण्याची परंपरा आहे असे म्हणल्यास हरकत नाही. तर या नव्या फ्यामिली मेम्बर चे नाव ‘मार्जार’ ठेवावे असा माझा प्रस्ताव होता. पण तो कुणाला ऐकायला गेलाच नाही बहुतेक. कारण माझे पप्पा तिला(मांजराला) चोरटी प्रिन्सेस म्हणतात. आता प्रिन्सेस चोरटी कशी असेल हेच मला कळत नाही. प्रिन्सेस ला सगळया सुखसोयी आपसूक हजर असतात मग तिला काही चोरायची काय गरज? पण असो. माझी आई तिला ‘आली ग बया मनी’ म्हणते. आता जगातल्या सगळ्या मांजरांचे नाव मनी असते हा योगायोग आहे. माझा भाऊ तिला ‘ए शुक शुक’ म्हणतो. आता शुक म्हणजे पोपट हे त्याला माहित नाही का पण मांजराला पोपट म्हणण्यात काहीतरी मजा असेल जी मला अजून तरी समजली नाही. मी मात्र या प्रिन्सेस मनी शुक ला म्याव म्हणतो. आता हे काय नाव झाले असे तुम्ही म्हणाल. पण आपण गायीला नाही का हंबा म्हणत तसेच मी मांजराला म्याव म्हणतो.

आता या म्याव चे नखरे ऐक्ण्याजोगे आहेत. तिला फक्त ताजे पदार्थच चालतात. कोणतीही गोष्ट जर ४ तासांपेक्षा आधी केली असेल तर   तिला तोंड हि लावण्याचे कष्ट ती घेत नाही. भूक लागल्यानंतर तिच्या अंगात एकदम लता मंगेशकर संचारत. कुठल्याही मांजराला इतक्या गोड आवाजात म्याव म्हणताना मी कधी ऐकले नाही. आणि ते फक्त म्याव नसते. बऱ्याचदा ते माSSSव, मांSSS, मांSSSSSSSSSSSSSSSSव असेही असते. म्हणजे एकंदरीत काम करून घेण्यासाठी लाडात येणाऱ्या सौफ्टवेअर कंपनीतल्या मुलींसारखा तिचा आवाज असतो. आणि समजा तुम्ही तिच्या समोर गेलातच तर तिच्या हाती येईल त्या पार्टला अंग घासून गुदगुल्या करत बसते. आता गुदगुल्या केल्या म्हणून कोणी खायला देतं का? मग अस्वलांना शिकार करायची गरजच पडली नसती. त्यांनी नुसते पकड एक माणूस कर गुदगुल्या, पकड दुसरा माणूस कर गुदगुल्या असे करून पोट भरले असते.

Advertisements

मांजर प्रवेश

लोक हौसेने मांजर पाळतात. कुणाला ते क्युट वाटते तर कुणाला ‘अय्या किती गोड आहे’ असे वाटते म्हणून. पण आमच्या घराची बातच निराळी आहे. माझ्या आईचा संसार सुरु झाल्यापासून तिला मांजरांनी (आणि बोक्यांनी) चांगलाच त्रास दिला आहे. कधी नुकत्याच तापवून ठेवलेल्या अख्ख्या एक लिटर दुधाचा फडशा पडणारे मांजर, कधी नुकतेच घेतलेले दुध फुटबॉल चा गोल केल्यासारखे फरशीवर सांडून जाणारा बोका, तर कधी पातेल्यात तोंड घालून दूध फक्त उष्टे करून जाणारे मांजर, अशा बऱ्याच मांजरांनी तिचे मांजर या जमातीबद्दल चे मत जाम कलुषित केले आहे. त्यामुळे आमच्या घरचा एक महत्वाचा नियम म्हणजे कुत्रा पाळा, म्हैस पाळा, बैल पाळा नाहीतर गाढव पाळा पण मांजर अजिबात पाळायचे नाही (म्हणजे नाही).

पण कुणाला माहित होते की इतक्या वर्षांनी आमच्या गावाकडे स्वतःच्या घरी राहायला आल्यावर असे काही घडेल? त्याचे काय झाले, एका सुंदर संध्याकाळी आम्ही सगळे आमच्या अंगणात ‘फ्यामिली गप्पा’ मारत बसलो होतो. तेवड्या एक मांजर जोरात पळत पळत तेथे आले. मागून एक मोठ्ठ कुत्रा धापा टाकत पोचला. आमच्या मातोश्रींनी तत्परतेने त्या कुत्रोबास चांगलास प्रसाद देऊन पळवून लावले आणि ते बहुतेक या मांजराने बघिईतले असावे. तेव्हापासून त्या मांजराने काही आमचे घर सोडले नाही (आणि त्या कुत्र्याने परत कधी तोंड दाखवले नाही). माझ्या आई ने या मार्जार जातीच्या घुसाखोरास हुसकून लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण जसे लहान मुल आई ने मारले तरी रडायला तिच्याच कुशीत जाते तसेच हे मांजर तिला घाबरून तिच्याच पायामागे लपायचे. आता या मंद मांजराला लपायचे कसे हे पण आपणच शिकवावे लागते की काय असा गहन प्रश्न मला पडला. आईचे मन कसे या मांजरावर जडले कुणास ठाऊक. पण पहिली गोष्ट हे मांजर शिकली म्हणजे ‘स्वयंपाक घरात पाऊल ठेवताच फटके बसतात’. या मांजराचे आगमन म्हणजे आमच्या घरात एका नव्या पर्वाची सुरुवात होती अशी मला दाट शंका होती आणि ती पुढे खरी ठरली.

खरे आणि खोटे

मी लहान असल्यापासून नोटीस करतोय की सगळे मोठे लोक लहान मुलांना “नेहमी खरे बोलावे” असे खोटे खोटेच सांगत असतात. आणि गम्मत म्हणजे हा खरे बोलण्याचा दंडक नेहमी लहान मुलांनाच लागू होतो. आणि तो पण उलट्या अर्थाने. समजा चिंटूने काहीतरी उचापत केली, तर बाबा (पप्पा) एक छडी घेतात आणि ती उगारून ओरडतात,” चिंटू, खरे बोल नाहीतर फटके देईन”…… चिंटू बिचारा प्रामाणिकपणे चूक कबूल करतो आणि वर फटकेही खातो. म्हणजे खरे बोला ते बोला आणि मार पण खा.

कल्पना करा कि एक दिवस सकाळी सकाळी तुम्ही हापिसात गेलाय आणि शेजारी बसणारी एक कुमारिका तुम्हाला पापण्यांची नाजूक फडफड करत विचारते,
“आज मी कशी दिसतेय रे?”
तुम्ही: “असे का विचारतेस आज?”
ती: “अरे काल बरीचशी शॉपिंग केली मी…”
तुम्ही: “काल तू बरीच “शी” शॉपिंग केली??? अरे देवा….”
ती: ” शी, ते नाही, नेहमीची शॉपिंग आपली. जा बाबा तू सरळ नाही का सांगू शकत…”
यावर तुम्ही सरळ सांगायला सुरुवात करता? फक्त खरे बोलायचे अशी तुमच्या कंपनीची पॉलिसी आहे असे समजा….. काही उत्तरे अशी असू शकतील……
१. “रंगवलेल्या म्हशीसारखी!!! काय हे ध्यान, तुझा कान केवढा, ते कानातले केवढे. प्रमाण नावाची काही गोष्ट असते की नाही??”

२. “तशी चांगली दिसतेस फक्त हा नवा ड्रेस घातला नसता आणि ते कानातले, हातातले आणि पायातले मॅचिंग केलं नसतं आणि केसाचा बो पिंक नसता आणि लिपस्टिक जरा फेंट आणि डोळ्याचं ते काय असतं ते लावलं नसतं तर अजून पण चांगली दिसली असतीस!! ”

३. “च्यायला, हा ड्रेसचा रंग कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय………अरे हो, परवा आमच्या मांजराने उलटी केली होती त्याचा असाच रंग होता……. आई मीन मांजराचा रंग बहुतेक..” 😀

अजून बरीच उदाहरणे(आणि उपमा) आहेत त्या तुम्ही कॉमेंट मध्ये लिहा.
आपण जर असे रोज रोज खरे बोललो तर किती दिवस जिवंत राहू?

तुमचा मॅनेजर येतो आणि विचारतो, “काय मग, आज काय काय केले?” आणि तुम्ही मस्तपैकी अवघड अवघड शब्द असलेली कामांची यादी सांगता. एक फाईल कॉपी-पेस्ट करायला किती एफर्ट लागले हे तुम्ही अगदी रंगवून सांगता. पण त्याऐवजी जर खरे सांगायचे म्हटले तर………. काय सांगणार मॅनेजर साहेबांना? “सकाळी आल्या आल्या जी-मेल चेक केले. नंतर जी-टॉक वर सगळ्यांना हाय केले. झम्पू ने कालच्या ट्रीप चे फोटो पाठवले होते ते पहिले आणि ते सगळ्यांना फॉरवर्ड केले. आमची चिनू फार छान गुड मॉर्निंग चे मेल पाठवते ते पहिले आणि पाठवले. नंतर एका कार्ट्याने मस्त जोक पाठवले होते ते इतरांना फॉरवर्ड केले. चॅट चालूच होते. मग मध्येच थोडे कामसुद्धा केले बर का. मग कॉफी ला गेलो. नंतर थोडे चॅट केले तेवढ्यात सगळे जेवायला उठले. जेवून आलो आणि मेल चा दुसरा राऊंड चालू झाला तेवढ्यात तुम्ही आलात कडमडायला…..”

किती अप्रेज़ल मिळेल असे बोललो तर??

हे सगळे लिहिण्याचा सारांश एवढाच की तुम्ही थोडेफार जर खोटे बोलत असला तर इट्स ओके!! चलता है!!!

चिखल्या

माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीचे नामकरण झालेले आहे. माझ्या कॉम्पुटर चे नाव डोक्या आहे तर टीव्ही चे नाव खोक्या आहे. 😀 स्कूटर चे नाव गाडीताई आणि रेडिओ चे नाव चिरकुट किरकिरे आहे. 😛 पण या सगळ्या मंडळींच्या कथा नंतर कधीतरी कारण आज नंबर आहे तो चिखल्याचा.

चिखल्या म्हणजे माझा बूट. मूळ नाव रेड टेप. याच्या फक्त नावातच ‘रेड’ आहे बाकी सगळे डांबर सुध्दा लाजेल असे काळे. 😀 चिखल्या अजून स्वतःला लहान समजतो. हा सगळ्या मुलांना काका आणि सगळ्या बायकांना ताई म्हणतो. 😀 😀 जगातल्या बहुतेक लहान मुलांसारखा याला पण चिखल फार आवडतो. जरा बाहेर नेला कि सगळा चिखल आपल्या अंगावर उडवून राडा करायची सवय या कार्ट्याला कुठून लागली देव जाणे. मी बिचारा जपून पाऊले टाकत असतो, का तर या चिखल्याला त्रास होऊ नये म्हणून आणि हा साला चक्क माझ्यादेखत स्वतःला चिखलात भरवून घेतो. याच्या तोंडाला चिखल्या कशा होत नाही काय माहीत.

परवा ऑफिस ला जाताना याने सगळ्या तोंडावर चिखलाचे पाणी उडवून घेतले होते. रस्त्यावरून चालताना लक्ष्यात नाही आले पण ऑफिस च्या इमारतीत पाऊल ठेवताच आपण किती “स्वच्छ” आहोत याचा मला साक्षात्कार झाला. लिफ्ट च्या समोर एक (आठव्या मजल्यावरच्या कंपनीतली 😉 ) सुंदर मुलगी एकटीच उभी होती. मी खुश. मनात म्हटले चला, दिवसाची सुरुवात तर चांगली होणार आज…नाश्त्याला अशी मुलगी ‘बघायला’ मिळाली 😛 पण माझी चाहूल लागताच तिने नेहमीप्रमाणे वळून पाहीले आणि ओळखीचे स्माईल देण्याआधी तिने बरोबर या चिखल्याकडे एक कटाक्ष टाकला. माझी दांडी गुल. इम्प्रेशन च्या ….. ची वाट!!!! च्यायला कधी कधी वाटते की “याचा बूट अस्वच्छ आहे” असे माझ्या कपाळावर गोंदलेले आहे की काय.
नको तेव्हा नको ते लोक बरोबर या चिखल्याकडे बघतात आणि जेव्हा मी याला स्वच्छ पॉलिश करून चकचकीत करून आणतो तेव्हा मात्र कोणी लक्ष पण देत नाही. कधी कधी वाटते की माणूस अनवाणी, नग्न आणि मागासलेला होता तेच बरे होते. त्या काळात पोरी किमान प्रत्येक गोष्टीच्या च्या ब्रँड वरून पोरांची लायकी तरी ठरवायच्या नाहीत. 😀

श्रावणमासी हर्ष मानसी…… डोंबलाचा आलाय हर्ष

श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणांत येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे….

हे सगळे ठीक आहे हो कवितेत म्हणायला. शाळेत होतो तेव्हा खरच मज्जा वाटायची या पावसाची. सूर्याचा ढगांच्या सोबतीने चाललेला लपाछपीचा खेळ मनाला मुग्ध का काय म्हणतात ते करायचा. पण पुण्यात आल्यापासून माझा पावसाळ्याचा कन्सेप्टच बदललाय. पाउस म्हटले की आम्हाला छातीत आणि आमच्या रेनकोटला चेनमध्ये धडकी भरते. वर्षभर नीट असलेली रेनकोट ची चेन पहिल्या पावसाचे निमित्त साधून बरोबर दगा देते आणि छत्री अशा ठिकाणी लपून बसते आम्हाला काय आमचे तीर्थस्वरूप आले तरी सापडत नाही. मग अर्ध-ओल्या अवस्थेत आम्ही ऑफिस मध्ये पाऊल ठेवतो.
पहिल्यांदा भेटतात ते दुचाकीस्वार जे “कोणतीही पूर्वसूचना न देता आलेल्या पावसामुळे” कराव्या लागलेल्या कसरतींचे वर्णन करण्यात दंग असतात. आमच्या ओलेत्या ध्यानाकडे बघून बरेचसे ‘कार’वाले मनातल्या मनात आणि काही नालायक खटारावाले उघड उघड हसतात. अशा दुरितांचे तिमिर जाओ असे मनापासून वाटते पण असो उगीच ज्ञानेश्वर चिडायला नकोत.
तर अशा तर्हेने भिगी बिल्ली झालेल्या आमच्या स्वारीकडे मुलीच काय, बायकाही चुकून सुद्धा बघत नाहीत. या सॉफ्टवेर इंडष्ट्री मध्ये येवून फार माज येतो लोकांना (मी पण त्यातलाच बर का 😉 )

चहा आणि माशा

आजकाल आमच्या ऑफिस बिल्डिंग च्या कॅन्टीन मधे फार माशा झाल्या आहेत. इतक्या माश्या की अगदी माशी सेनाच म्हणालात तरी हरकत नाही. या माशी सेनेची सकाळी सकाळी कवायत चालू असते. कॅन्टीन चे कर्मचारी एकही माशी पदार्थात पडणार नाही याची काळजी घेताना दिसतात. मला अशी शंका येते की ते कर्मचारी माशी बसू नये यापेक्षा पदार्थात पडलेली माशी दिसू नये म्हणून जास्त प्रयत्नशील असतात. 😀 😀

आज मला सकाळी नाश्ता करायला इडली-माशी सांबर मिळाले. तसे ते माशीयुक्त नव्हतेच आधी, पण आम्ही जेव्हा माशी-बटालियन ला कशीबशी हुलकावणी देवून त्यांनी बळकावलेले टेबल परत मिळवले तेव्हा काही माश्यांनी हाराकिरी केली. काही माशांनी पराभवाची चव घेण्याऐवजी सांबर तलावात आपले शरीर झोकून दिले….. त्यांच्या या बलिदानाचा अपमान नको म्हणून आम्ही नंतर त्या सांबर (आणि पर्यायाने नाईलाजास्तव इडलीस) हात ही लावला नाही हेही तितकेच खरे.

लंच टाइम ला मात्र या माशी सेनेची पळापळ झाली असणार. कारण जेव्हा आमच्या दुपार-भोजन-दलाने कॅन्टीनक्षेत्रात प्रवेश केला तेव्हा ते माश्यानाही लाजवेल इतक्या माणसांनी भरून गेले होते. 😀 माश्या आपल्या कशाबशा जीव मुठीत धरून इकडे तिकडे धावत होत्या. त्यमुळे दुपारचे जेवण कोणत्याही माशी-घटनेविना पार पडले!!

आता संध्याकाळी मात्र मला रिस्क घ्यायची नव्हती त्यामुळे चहा साठी बाहेर च्या टपरीवर जायची आईडिया काढली. बाहेर तर माश्यांचे आख्खे साम्राज्य भेटले. शेवटी चहा घेताना मी प्रत्येकाला विचारून घेतले, ” तुझ्या चहात किती माश्या हव्यात? आधीच सांगा, नंतर माश्या बदलून मिळणार नाहीत” 😀 😀

श्री गणेशा

ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा || १||
देवा तूंचि गणेशु| सकलार्थमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तिदासु| अवधारिजो जी || २||
हें शब्दब्रह्म अशेष| तेचि मूर्ति सुवेष| जेथ वर्णवपु निर्दोष| मिरवत असे || ३||

आज आषाढी एकादशी!! लाखो वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात त्या कानड्या राजाला साद घालताहेत. आयुष्यात एकदा तरी वारीतून पंढरपूर ला जायचे हि माझी इच्छा आहे. कधी कधी वाटते कुठून या सॉफ्टवेर इंडस्ट्रीमध्ये येऊन पडलो आणि आयुष्यातल्या सगळ्या आनंदांनी पाठ फिरवली. सगळे मित्र दूर गेले. किंवा मी सगळ्या मित्रांपासून दूर गेलो. असो. तर मला एकदातरी वारीमध्ये सामील व्हायचे आहे आणि मला नाही वाटत त्यासाठी फार दिवस वाट पहावी लागेल….

तसा मी आधी इंग्लिश मध्ये ब्लोग लिहायचो. तसा अजूनपण लिहितो. पण आता कंटाळा आला. “आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत” असे म्हणतात त्याचा मला चांगलाच प्रत्यय आलाय. पण “जे होते ते चांगल्यासाठीच होते” हेही तितकेच अनुभवलेय मी. आता वाटते कि माझा मराठीत ब्लॉग लिहायचा निर्णय थोडा धाडसी आहे कारण इंग्लिश ब्लॉग इतके वाचक मिळतील का नाही हि शंका. पण बघू. हेही करून बघूच. प्रयत्न च केला नाही तर तुमची लायकी काय आहे हे कसे कळणार? नाही का?

तर जे कोणी वाचाकमित्र इथे येतील ते मला योग्य ते प्रोत्साहन देतील अशी अपेक्षा. कळावे. आपला विश्वासू….. अरेरेरे अपेक्षा लिहिले कि कळावे आपोआप येते आणि कळावे आले कि आपला….. चला. भेटू परत मग.
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल…………..